Thursday, November 8, 2007

पहिली शाळा - भाग १

(अरुशीच्या बाबाचे मनोगत)
मला तुम्ही शाळेत घालत नाही म्हणून तिची कुरकुर सहा महिन्यापासून सुरु झाली होती. शेजारच्या एका संस्थेत कौटुंबिक कार्यक्रमांना ती जायला लागली तेव्हापासून. तिला ते आवडे पण तिथे आठवड्यातून एकदाच जाणे होई. तशातच आमच्या चर्चा ऐकताना कधितरी तिला कळाले की दररोज जाता येण्यासारखी सुद्धा शाळा असते. त्यात तिला आमच्या इमारतीतल्या काही मैत्रिणी शाळेत जाता येताना भेटत होत्या. त्यांच्या पाठीवरच्या पिशव्या, हातातल्या पाण्याच्या डब्या तसेच नवनवीन वह्या-पुस्तके पाहून तिला कधी येकदा शाळेत जाते असे झाले होते. त्यावरून एक-दोन दिवसांत एखादे भोकाड पसरणे चालू असे.

आमचा सुद्धा शाळा शोध सुरु झाला. काहीचा महिती नव्हती. या वयाच्या मुलांना कसल्या प्रोग्राम मध्ये टाकायचे असते हे सुद्धा माहित नव्हते. मग अनुभवी पालकांकडून माहिती मिळवायला सुरुवात केली. त्यांच्या पाल्यांच्या शाळेत फोन केले. तेव्हा समजले की २११ क्रमांकावर या विषयासाठी चकटफू मार्गदर्शन मिळते. मार्गदर्शन तसेच अजूबाजूच्या शाळांचे क्रमांक मिळाले. हिला school readiness program असणा-या pre-school मध्ये भरती करावे असे सांगण्यात आले. तसेच जर कमी खर्चात पाहिजे असेल तर शासकीय अनुदान घेत असलेल्या संस्थांमध्ये जावे असा सल्ला सुद्धा मिळाला.

आम्हाला सुद्धा आता हिला शाळेत घालायचेच होते. मराठी उत्तम बोलता येते, सांगितलेले खूप चांगले ऐकते हे सगळे खरे असले तरी इंग्रजीत आमची बोंबाबोंब होती. अर्था आम्ही जाणून बुजून तिला बळेच आमच्या मित्रांच्या मुलांप्रमाणे इंग्रजी ऐवजी मिंग्रजी शिकवले नव्हते. काही जाणकारांच्या सल्ल्यानुसार तिला पहिल्या २-४ वर्षांत केवळ मातृभाषा उत्तम शिकवण्यावर आम्ही भर दिला होता. तेव्हा शाळेत जाऊन तिने इंग्रजी शिकावे, तसेच इथल्या मुलांप्रमाणे इथल्या चालीरिती (दैनंदिन जीवनातल्या बाबी) शिकाव्यात अशी आमची अपेक्षा होती.

आमच्या घराच्या एक-दीड मैलात एवढ्या जास्त शाळा आहेत हे त्यांना भेट दिल्यावरच कळत होते. सप्टेंबर उजाडलेला असल्याने सगळ्या चांगल्या शाळा भरलेल्या होत्या. जेथे रिकाम्या जागा होत्या तेथे अरुशीने इंग्रजी ऐवजी सिंग्रजी शिकावी असे मला वाटत नव्हते. हिला मात्र ज्या शाळेत जावे तेथे लगेच थांबायचे होते. शेवटी घराजवळ असणारी, चांगली वाटणारी शाळा सापडली. फी जरा जास्तच होती. खिशाला जवळपास घरभाड्य़ा येवढेच दुसरे भोक पडणार होते. पण त्याशिवाय पर्याय दिसत नव्हता.

शाळेच्या पहिल्या भेटीसाठी सगळी कागदपत्रे तसेच अरुशीला सोबत घेऊन आमची स्वारी ठरलेल्या वेळात पोचली. शाळेचे वातावरण चांगले होते. बाहेरच्या आंगणात लावलेल्या घसरगुंड्य़ा वगैरेवर बाईसाहेबांचा क्षणात हल्लाबोल झाला होता. कुठे गेल्यावर दबकून राहण्याचा आमच्या पिढीचा स्वभाव आमच्या पोरीत अजिबात नसल्याने कोणाकडे लक्ष न देता "हेSSS, बाबाSSS" असे म्हणत आमची स्वारी घसरगुंडीवरून घसरत खाली पोचतच होती. तितक्यात तेथे उपस्थित असणा-या मास्तरणींतल्या एकीने पुढे येऊन मला सांगितले की ती घसरगुंडी केवळ मोठ्या मुलांसाठी आहे तेव्हा तुमच्या मुलीला तेथे खेळू देणे योग्य नाही. आणि तिकडे मात्र ही घसरगुंडीवर उलट दिशेने चढत होती. ते पाहून तिथले गोरी अन काळी बालके मात्र आश्चर्यचकित झाली होती.

प्रवेशाची formalities पार झाल्या. अरुशीला शाळा भारी आवडली होती. तिच्या दॄष्टिकोणातून पहायचे झाल्यास येथे केवळ खेळायला मिळणार, खूप सारे संवगडी असणार अन आई-बाबांचा घाक नसणार अशी तिची अपेक्षा मला कळून चुकली होती.

शाळेसाठी काय काय विकत आणायचे याची यादी घेऊन तसेच शाळेत आणून सोडण्याचे, घेऊन जाण्याचे वगैरे नियम समजाऊन घेऊन आम्ही बाहेर पडलो. जयाने एकदा शाळा पाहिली अन पहिला चेक दिला की पुढच्या सोमवारी शाळा सुरु होणार होती.

(क्रमश:)

3 comments:

कोहम said...

apale anubhav vchayala maja yet ahee. keep writing..

Pradeep's said...

Bhaaskar,
Really Arushi is very lucky !!
Tila tujhyasarkha baba milala mhanun !!

Asech lihit raha, nidan hya madhyamatun tari amhi arushichya sahavsat ahot ase watte .
Pradeep

GIRISH KULKARNI said...

chan bhaskar,khupach chan lihile ahes,mala wait watte ki mi khup diwasanantar wachto ahe he.Chan asech lihit ja.